मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाकरे सरकारने प्रार्दुभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून प्रसार रोखण्यासाठी आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने 1 मे सकाळी 7 वाजल्यापासून ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. याबाबत सरकारकडून जीआर काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भाजपाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. सांगा गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल भाजपाने विचारला आहे.
महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "मुख्यमंत्रीजी सांगा गरिबांनी जगायचं कस? 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा...5 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केशव उपाध्ये यांनी "संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज 15 दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन म्हणावा तेवढा कठोरपणे पाळला जात नाही, असे अनेक जिल्ह्यात दिसत आहे. सकाळच्या वेळी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी काळजी निर्माण करत आहे. त्यामुळे आहे तो लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवा, शिवाय तो आणखी कठोरपणे अंमलात आणा, अशा सूचना एकमताने सर्व मंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या. पोलिसांनी थोडा संयम कमी करून मोकाट फिरणाऱ्यांना बंधने आणली पाहिजेत. जाब विचारला पाहिजे, अशा सूचनाही काही मंत्र्यांनी केल्या होत्या.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी (BJP Kirit Somaiya) काही दिवसांपूर्वी ठाकरे हल्लाबोल केला होता. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी" असं म्हटलं होतं. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले होते. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे" असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं होतं.