मुंबई – महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांच्यावर हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. याबाबत सोमय्यांनी ईडी, आयकर विभाग, निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली असून जाधव कुटुंबावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिका माफिया कंत्राटदारांचा अड्डा आहे. त्याचे लाभार्थी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव(Yashwant Jadhav) आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव(Yamini Jadhav) आहे. शिवसेना म्हणजे खंडणी सेना, ठाकरे सरकारमध्ये वसुली सरकार आहे. प्रधान डिलर्स कंपनीसोबत आपल्या आर्थिक व्यवहाराची स्पष्टता करणार का? असा सवाल सोमय्या यांनी यशवंत जाधव यांना केला आहे. यशवंत जाधव कुटुंबाने हवालाच्या माध्यमातून युएई येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच यूएईमधील या कंपन्या यशवंत जाधव यांच्या मालकीच्या आहेत. यूएईमध्ये त्या कंपन्यांची नोंदणी आहे. यात जो पैसा गुंतवला तो प्रधान डिलर्स कंपनीच्या मार्फत घेण्यात आला. यूएईमध्ये येथील कंपन्यांमध्ये जो पैसा गुंतवला. भारतातून पैसा त्याठिकाणी पाठवण्यात आला. तो पैसा जाधव कुटुंबांकडून ट्रान्सफर झाला आहे. प्रधान डिलर्स ही कोलकात्यातील मनी लॉन्ड्रिंग करणारी कंपनी आहे. या कंपनीचे संचालक चंद्रशेखर राणे, कृष्णा तोरी त्याचसोबत उदय महावरच्या विरोधात आयकर खात्याने चौकशी केली आहे. उदय महावरने बऱ्याच नेत्यांना मनी लॉन्ड्रिंग करण्यास मदत केली आहे. सेल कंपनीच्या नावानं हवाल्याचे पैसे ट्रान्सफर केले आहे. ईडीच्या चौकशीतही त्याचे नाव आले आहे. सेल कंपनी काढून त्यात पैसे ट्रान्सफर करतो आणि जाधव कुटुंबाला चेक देतो असं चौकशीत कबुल केले आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, काळा पैसा आला कुठून?
काळ्याचे पांढरे केले, मग हा काळा पैसा कुठून आला? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) द्यावं. हा पैसा मुंबई महापालिका माफिया कंत्राटदारांचा आहे. कोविड काळात महापालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केला त्याचा तो पैसा आहे. याबाबत निवडणूक आयोग, आयकर विभाग, ईडी, कंपनी मंत्रालया या सगळ्यांकडे लिखित तक्रार केली आहे. यशवंत जाधव यांच्यावर ताबडतोड कारवाई व्हावी आणि यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी(BJP Kirit Somaiya) केली आहे.
यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केले मनी लॉन्ड्रिंग
उदय महावर मनी लॉन्ड्रिंगचा धंदा करतो. कंत्राटदारांकडून आलेला पैसा यशवंत जाधव कुटुंबाने रोख रक्कम महावरला दिली. ती रक्कम सेल कंपन्यांच्या माध्यमातून प्रधान डिलर्सला दिले. त्यानंतर प्रधान डिलर्सने यशवंत जाधव यांना पैसे दिले. ते पैसे जाधव कुटुंबाने युएईच्या कंपन्यांमध्ये गुंतवले. जवळपास १५-२० कोटींचा हा घपला आहे. परंतु सध्या १ कोटीबाबत कागदोपत्री पुरावा आहे. प्रधान कंपनीने पैसे का दिले? महावरने चौकशीत कबुल केलंय की, जाधव यांचे पैसेच त्यांना पुन्हा परत दिले असं सोमय्यांनी सांगितले आहे.