भोपाळ: महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर पक्षानं सूचना दिल्यानंतर त्यांनी विधानाबद्दल माफी मागितली. यानंतर आज भाजपाच्या आणखी दोन नेत्यांनी अकलेचे तारे तोडले. यावरुन भाजपा अध्यक्षांनी अमित शहांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीसदेखील बजावली. आता भाजपाच्या आणखी एका नेत्यानं राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान केलं. महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचं भाजपा नेते अनिल सौमित्र यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक,' अशी वादग्रस्त पोस्ट सौमित्र यांनी केली. 'काँग्रेसनं त्यांना राष्ट्राचं पिता केलं. राष्ट्राचा कोणीही पिता नसतो. पुत्र असतात. चर्चमध्ये फादर असतात. काँग्रेसनं त्याचं हिंदी रुपांतर केलं,' असं सौमित्र यांनी म्हटलं. भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काल महात्मा गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता आणि देशभक्त राहील असं वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. यानंतर भाजपानं हे साध्वी यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत हात वर केले. साध्वी यांना माफी मागण्याच्या सूचनादेखील नेतृत्वाकडून देण्यात आल्या. साध्वी यांना पक्षाकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित शहांनी दिली.
महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता; भाजपा नेता बरळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 3:11 PM