मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले, त्यावेळी कोर्टाने पुराव्याअभावी पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयावरुन भाजपाने शिवसेनेला टोला लगावला आहे. रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे
याबाबत आशिष शेलार म्हणाले की, अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन "दिशा सालीयन" बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी...त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका "सिंह" यांना "परमवीर" का देताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील काही मुद्दे असे की, १) २०१८ सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे "अ" समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला. २) पोलीस कोठडीचे सर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही. ३) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही असं म्हटलं आहे. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला असा घणाघात आशिष शेलारांनी केला.
दरम्यान, आता न्यायालयालच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता अग्रलेख न्यायालयावर..? खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!! असा चिमटाही शेलारांनी शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
अर्णबला सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक
आलिशान स्टुडिओमध्ये बसून ‘पुछता है भारत’ असा सवाल उपस्थित करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खावी लागत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर येथील नगर परिषदेच्या मराठी शाळेमध्ये उपकारागृह निर्माण केले आहे. त्यातील एका खोलीमध्ये गोस्वामी यांना राहावे लागत आहे. नियमानुसार आरोपींना जी वागणूक दिली जाते तीच वागणूक गोस्वामी यांना मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारागृहाच्या नियमांनुसारच गोस्वामी यांना वागणूक दिली जात आहे. कोविडच्या नियमांमुळे नातेवाइकांच्या मुलाखतीही बंद केल्या आहेत. त्यामुळे गोस्वामी यांना नातेवाइकांना भेटता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याच कारागृहामध्ये अन्य गुन्ह्यांतील ४२ आरोपींना ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोस्वामी यांच्याजवळ मोबाइलही देण्यात आलेला नाही. त्यामुळे नेहमीच जगाच्या संपर्कात असलेल्या गोस्वामी यांचा संपर्क तुटल्याचे बोलले जाते. त्यांना बाहेरूनदेखील जेवण देण्याला कोविडचा नियम आडवा आला. जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, चपाती असे साधेच जेवण असते, त्याचप्रमाणे नियमानुसार जे पाणी अन्य आरोपींना पिण्यासाठी दिले जाते तेच पाणी गोस्वामी यांना दिले जात आहे. एक कॉट, ट्युबलाईट आणि डोक्यावर गरगरणारा पंखा अशा सुविधा असल्याचेही सूत्रांनी सांगितले. गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीची आजची दुसरी रात्र आहे.