पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पूजाचे समोर आलेले नवे फोटो, ऑडिओ क्लिप यांच्यामुळे राठोड यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु संजय राठोड यांची त्यांनी लगेच भेट घेतली नाही. त्यांना दीड तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. तसंच भेटीनंतर अवघ्या दोन मिनिटांचा त्यांना वेळ दिल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली. बहुधा त्यांनी कानात सांगितलं असावं मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे," असं म्हणत भातखळकर यांनी राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला. राठोड यांनी घेतली होती भेटराठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावं लागलं. तसंच यानंतर त्यांनी केवळ दोनच मिनिटं राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही.
संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, "बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:30 PM
बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
ठळक मुद्देबुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेटदीड तासांच्या प्रतीक्षेनंतर राठोड यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी केली दोन मिनिटं चर्चा