राज्य कायद्याचे आहे, पप्पा किंवा पप्पूचे नाही; भाजप नेत्याचा पटोलेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 06:18 PM2021-02-18T18:18:08+5:302021-02-18T18:20:44+5:30
Nana Patole on Bollywood Actors : काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन टिवटिव करणारे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आता गप्प का? असा सवाल पटोले यांनी केला होता.
काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन टिवटिव करणारे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आता गप्प का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ, अक्षय यांना महाराष्ट्रात शुटिंग करू देणार नाही, असा थेट इशारा दिला. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्वीट्सचा संदर्भ देत नाना पटोले यांनी दोन्ही कलाकारांवर सडकून टीका केली. यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
"नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो. तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे, पप्पा किंवा पप्पूचे नाही," असं म्हणत भातखळकर यांनी पटोले यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले पटोले?
"काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय यांच्यावर टीका केली. यासोबतच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परवड होत असताना अमिताभ व अक्षय यांची चुप्पी योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शूटिंग करण्याचा अधिकार नाही. त्यांचं जिथं कुठं शूटिंग सुरू असेल तर बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू, असा थेट इशाराच नाना पटोले यांनी दिला.