येत्या काही दिवसांमध्ये आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडू शकतात. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. भाजपनं एकीकडे जोर लावण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेसही रिंगणात उतरली आहे. राहुल गांधी यांनि शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमधून पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली. तसंच त्यांनी CAA लागू करु देणार नसल्याचंही सभेदरम्यान म्हटलं. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला आहे. "देशाच्या जनतेनं गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेसला विरोधी पक्षनेता बनू देण्याच्याही लायकीची ठेवली नाही. पण त्यांच्या डोक्यातून अजूनही आपण सत्ताधारी असल्याचा भ्रम जात नाही. राहुल गांधी केंद्र सरकारला देशात CAA लागू न करू देण्याचे न पेलणारे आव्हान देणारे तुम्ही कोण?," असं म्हणत भातखळकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर निशाणा साधला.काय म्हणाले होते राहुल गांधी?"अवैध इमिग्रेशनचा मुद्दा आहे. परंतु आसामच्या लोकांमध्ये तो सोडवण्याची क्षमता आहे. आसामला नुकसान झालं तर देशाचंही नुकसान होतं. काहीही झालं तर CAA येथे कधीही लागू होणार नाही. हम दो हमारे दो असलेल्या सरकारनं ऐकून घ्यावी या ठिकाणी कधीही CAA लागू होणार नाही," असं राहुल गांधी म्हणाले. "हम दो हमारे दो आणि बाकी सर्वांनी मरून जावं. हम दो हमारे दो... आसाम चालवत आहेत. आसाममध्ये जा, आग लावा, आणखी जे काही आसाममध्ये आहे ते लूटा. जे या ठिकाणी द्वेष पसरवण्याचं काम करतील त्यांना इकडची जनता आणि काँग्रेस मिळून योग्य धडा शिकवू," असंही ते म्हणाले. "काँग्रेस छोटे व्यापारी, कष्टकरी आणि गरीब लोकांचा पक्ष आहे, आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा एक गोष्ट होईल. जो द्वेष पसरवला जात आहे तो कमी होईल. आम्ही सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचं संरक्षण करू. २००४ ते २०१४ या काळात भारताचा झपाट्यानं आर्थिक विकास झाला. कोट्यवधी लोकांना आम्ही गरीबीतून बाहेर काढलं. आम्ही तरूणांमधील भीती घालवून टाकू. आसाममधील बेरोजगारी आम्ही संपवू," असंही ते म्हणाले. रिमोटनं आसाम चालणार नाही"रिमोट हा टीव्ही चालवू शकतो परंतु आसाम चालवू शकत नाही. तुमचा मुख्यमंत्री हा आसामचाच असायला हवा. तुमच्या मुख्यमंत्र्यांना आसामचीच कामं करायला हवी. सध्याचे मुख्यमंत्री दिल्ली आणि गुजरातच्या इशारावर कामं करतात. म्हणूनच आपल्याला त्यांना हटवायचं आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.