गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर आहे. यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. वाढत्या दरवाढीवरून शिवसेनेनं मोदी सरकारसह भाजपवरही टीकेचे बाण सोडले आहेत. राममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील, असं म्हणत सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेनं केंद्रावर निशाणा साधला होता. यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला टोला लगावला आहे."संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असलाच तर तो टक्केवारीशी आहे. त्यामुळे त्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून राम मंदिराचा चंदा आठवला. काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण मात्र लागलाय. पेट्रोल-डिझेलच्या दरात २६ रूपयांचा वॅट राज्य सरकारचा आहे. तो कमी करा. ममता बॅनर्जींचं एवढं तरी ऐका. मग त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करा," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी जो कर जमा करतायत त्याचा ४१ टक्के तुम्हाला मिळतोय. त्यामुळे लोकांना विनाकारण भडकवायचं आणि खोटं बोलायचं हे उद्योग आता संजय राऊत यांनी बंद करावेत, असंही ते म्हणाले.
"संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 3:24 PM
सामना संपादकीयतील राम मंदिरावरील मुद्द्यावरुन भाजप नेत्याचा राऊतांना टोला
ठळक मुद्देराममंदिरासाठी 'चंदा वसुली' करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, असं म्हणत सामनातून करण्यात आली होती टीकाकाँग्रेसमुळे वाण नाही पण गुण लागला, भाजप नेत्याचा टोला