पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेले राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड हे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले होते. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाना झाले. दरम्यान, संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली होती. तसंच घरातून निघाल्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्यांची तुलना गजा मारणेशी करत टोला लगावला."संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हे मंत्री आहेत एवढाच फरक. समाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच आहे," असं म्हणत भातखळकर यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर हल्लाबोल केला. "जंगल मंत्री संजय राठोड पोहरा गडावर शक्तिप्रदर्शन करणार असतील तर संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने निरर्थक शक्ती कायद्याची टिमकी वाजवून नये. तसंच मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या जनतेला उपदेश करणारे रटाळ फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करू नयेत," असंही ते म्हणाले. काय केलं होतं गजा मारणेनं ?अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, गेल्या सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. या वेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरडा केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन ४०० ते ५०० अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोथरुडमध्ये मंगळवारी (दि. १६) रात्री गजा मारणे व समर्थकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून हमराज चौकातील गणपती मंदिरात विनापरवाना आरती केली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर गजा मारणेला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं होतं.