... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 18:13 IST2021-02-09T18:10:14+5:302021-02-09T18:13:11+5:30
Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीट्सची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेलिब्रिटींवर जोरदार निशाणा साधला होता. "सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? तुम्हाला सेलिब्रिटी रस्त्यावरच्या याच लोकांनी केलं ना?, या गरीबांना जे समजतं ते तुम्हाला का समजत नाही?, तुम्हाला कोण वापरून घेतंय हे समजत नाही का?" सवाल संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
"सेलिब्रिटींना मेंदू नाही का हा प्रश्न फक्त देशाचा आवाज बुलंद करणाऱ्यांबाबत पडतो का? रिहानाचे समर्थन करताना हा प्रश्न का पडला नाही? तेव्हा तुमचा मेंदू सिल्व्हर ओकवर गहाण होता का संजय राऊत?," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर टीका केली.
ट्वीटच्या चौकशीचे आदेश
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात कुणाच्या दबावाखाली ट्वीट केले होते का, याची चौकशी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात येईल, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी काँग्रेसला दिलं.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्वीटची चौकशी करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वूटला भारतीय सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षयकुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आदींचा समावेश होता. अक्षयकुमार आणि सायनाच्या ट्विटमधील शब्दन् शब्द सारखे आहेत. तर अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या ट्वीटमध्ये मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांचा उल्लेख केला आहे. या सेलिब्रिटींना भाजपने प्रवृत्त केले होते का, भाजपचा त्यांच्यावर दबाव होता का, या अनुषंगाने चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली होती.