मुंबई - भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम कमी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तीन दिवस उलटून गेलेले असताना सुद्धा अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा साधे चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील खाजगी रुग्णालयांमधील खाटा अधिग्रहित करण्याच्या यादीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील व ३१ मार्च रोजी परवाना संपणाऱ्या सनराइज हॉस्पिटलचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, यातून शिवसेनेच्या वरदहस्तामुळेच सनराइज हॉस्पिटल सुरू होते हे सिद्ध होते, असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (BJP Leader Atul Bhatkhalkar said, "Even though 11 people died, the ruling Shiv Sena's love for Sunrise Hospital still remains")
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्धे व महापालिकेतील कर्मचारी यांना उपचार घेता यावा या सबबीखाली सनराइज हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली. या मान्यतेच्या प्रक्रियेसाठी महापालिकेचे अधिकारी, सनराइज हॉस्पिटलचे संचालक यांचा 'रिव्हायवल सनराइज हॉस्पिटल' या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला, दि,25 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या अर्जावर अर्थपूर्ण संवादातून केवळ दहा दिवसात नाममात्र प्रक्रिया करून 6 मे 2020 ला परवानगी देण्यात आली. असे करताना मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.
मुंबईत मागील दहा वर्षात झालेल्या अनेक आगीच्या घटना घडल्या. कमला मिल येथील दुर्घटना असो किंवा मागच्या वर्षी सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग असो किंवा त्या अगोदरच्या अनेक घटनांमध्ये बेकायदेशीर रित्या बांधकाम करण्यात आलेले होते किंवा अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले होते, हे समोर आलेले असताना सुद्धा 'टक्केवारीपूर्ण' काम करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने त्याकडे कानाडोळा करण्याचे काम केले, असा आरोप सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केला.
मुंबई सर्वांत सुरक्षित शहर असल्याचे म्हणून स्वतःची पाट थोपटून घेणाऱ्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2008 ते 2019 या 11 वर्षांत आगीच्या 58,587 घटना घडल्या असून त्यात तब्बल 704 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात 5 अग्निशमन अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. इतकी भयावह अवस्था असताना सुद्धा आजही मुंबईत तेराशे पेक्षा जास्त अनधिकृत रुग्णालये सुरु असून व 29 मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे महानगरपालिकेच्या आकडेवारी वरून समोर आले असताना सुद्धा, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. लोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु टक्केवारीतून आपले खिसे कसे भरतील हे पाहण्यातच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मशगुल असल्याची टीका सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.