"मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचं गॅझेट घालून अदृश्य झाले, बहुदा ते..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:05 PM2021-04-26T17:05:39+5:302021-04-26T17:10:28+5:30
भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला. यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनीही केली होती टीका
सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील आरोग्य यंत्रणांवरही ताण आहे. याशिवाय आवश्यक औषधांचाही तुटवडा असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीतवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. "मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवारचं जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
"मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसत आहे," असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले होते आंबेडकर ?
"१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारनं खरं तर मोफत लस देणं गरजेचं आहे. त्या दराबाबत "लसीच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत" असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. "लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी? सगळ्यांना १५० रुपयात लस द्यावी," असेही यावेळी म्हणाले. कोरोनामुळे मी आठवड्याची मुदत देतो अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
मुखमंत्री उद्धव ठाकरे कुठंही दिसत नाहीत. सर्व निर्णय अजित पवारच जाहीर करत असतात. सध्या खरे मुखमंत्री कोण आहेत? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.