मुंबईशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. यापार्श्वभूमीवर राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. राऊतांच्या टीकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण...केवळ तोंडाच्या वाफा, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला?", असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा माकड म्हणून उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरही भातखळकर संतापले. "संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करत आहेत. चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे", असं भातखळकर म्हणाले.
भातखळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओही ट्विट केला आहे. "संजय राऊत यांनी आज वैफल्यग्रस्ततेने सवंगपद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्राला हादरे बसतील असं ते म्हणाले, पण तुमचं तोंड दाबलंय कुणी? उघडा ना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने कुणाला फरक पडणार नाही. कर नाही त्याला डर असण्याचं कारण नाही. थेट पुरावे द्या. ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपवर आरोप करण्याचे उद्योग थांबवा. कंपाऊंडरकडून औषध घेता आता एमडी डॉक्टरकडून घ्या म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठिक होईल", असं भातखळकर म्हणाले.
संजय राऊत यांनी केला जोरदार हल्लाबोलखासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. भाजपच्या या हस्तकांनी मला २२ आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.