मुंबई : गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सत्तांतर भाजपा सरकारने मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन केले. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला. पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केले?,” असा सवाल चंद्रकात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. (bjp leader chandrakant patil blame to mahavikas aaghadi government on maratha reservation)
मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी याच मुद्द्यावरून सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पाटील यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. "तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते", असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, "मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केले. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली",अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. तसेच, अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण १०२ व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वीचे आहे. आम्ही हे ठामपणे उच्च न्यायालयात मांडले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात विषयाला फाटे फोडून मराठा आरक्षणात गोंधळ निर्माण केला, असा आरोप चंद्रकात पाटील यांनी केला. तसेच, मराठा समाजाला आरक्षणासाठी मी आणि स्वतः देवेंद्रजी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहे. आतातरी ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावलं उचलावी व आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.