सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 04:52 PM2021-05-27T16:52:16+5:302021-05-27T16:55:24+5:30
मराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
सध्या सरकारमध्ये काही वाद सुरू आहेत, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तसंच या सर्व अफवा असून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असंही सत्ताधाऱ्यांकडून सांगत चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल असं मोठं विधान केलं आहे.
"देवेंद्र फडणवीस मध्यंतरी असं म्हणाले, झोपेतून उठलो होतो आणि सरकार गेलं होतं. केसानं गळा कापण्यासारखा विश्वासघात झाला होता असं ते म्हणाले. मी त्यावर असं म्हटलं तुम्ही सर्व विचारताय हे सरकार कधी जाईल. ते असंच सर्वजण झोपेत असताना सरकार जाईल. त्यांना कळणारच नाही सरकार कधी गेलं," असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
यांना आरक्षणच द्यायचं नव्हतं
"यांना मराठा समाजाला कधी आरक्षणच द्यायचं नव्हतं. १९९५-९९ आणि २०१४ -१९ ही वर्ष सोडली तर यांचंच राज्य होतं. त्यांनी त्यावेळी का नाही दिलं मराठा आरक्षण?," असा सवालही त्यांनी केला. "आता रिव्हू पीटीशन दाखल करतील नाहीतर लोकं यांना मारतील. परंतु ते रिव्ह्यू पीटीशन योग्यरित्या चालवणार नाहीत. केंद्र रिव्ह्यू पीटीशन योग्यरित्या चालेवेल. मराठा समाजाला वर्षानुवर्ष आंदोलन करूनही जे आरक्षण मिळालं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि टिकवलंही. परंतु या सरकरला ते टिकवता आलं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे कोणी आंदोलन करतील त्याला आमचा पाठींबा आहे," असंही पाटील म्हणाले.