मुंबई – मुख्यमंत्री घरात बसून काम करतात या विरोधकांच्या आरोपावर रविवारी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे उत्तर दिले. जिथे तुम्ही जाऊ शकत नाही, तिथे मी पोहचलो, दुर्गम भागात मी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला होता. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुळात हे वक्तव्य पुन्हा एकदा मातोश्रीत लपून राहण्यासाठी केलं आहे. उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे किती रुग्णालय आणि कोविड सेंटरचे निरीक्षण केले? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यावे. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
तसेच केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या आढावा घेण्यात तुम्ही कसले समाधान मानत आहात? तुमच्या मातोश्रीबाहेर न निघण्यामुळे कित्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे धैर्य खचले आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? हे कधी समजणार हेच कळत नाही. त्यामुळे केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष फिरलात तर तुम्हाला राज्याच्या जनतेचे खरे प्रश्न कळतील अशी टीकाही भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मास्क बाजूला सारण्याची गरज
विरोधी पक्ष राजकारण करतंय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. मग कंगना राणौत विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला? तुम्हीच केला ना. सुशांत सिंग प्रकरणात एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी जर योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास यंत्रणेला काहीच करावे लागले नसते. त्यामुळे आता तुम्हाला आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. मास्क लावल्यामुळेच कदाचित विरोधी पक्ष राजकारण करत असेल असे वाटत असेल पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
जनहितासाठी काही मागणी केली तर राजकारण कसे करतोय?
राज्यात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय सोयीसुविधांची मोठी कमतरता आहे. शेतकरी गेल्या ९ महिन्यापासून अनेक मागण्या करत आहेत. मराठा समाजाच्या हक्कांचे संरक्षण हे राज्य सरकार करु शकलं नाही. आम्ही जर जनहितार्थ कोणत्याही मागण्या केल्या तर आम्ही राजकारण करतोय? म्हणजे मुख्यमंत्री जे करत आहात, उदा. लोकांचे ऑफिस तोडणे, सतत अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, सेवानिवृत्त सैनिकांना मारहाण करणाऱ्यांना जामीन देणे, हे सर्व राजकारण नाही आणि आम्ही जनहितासाठी योग्य मागण्या केल्या तर ते राजकारण झालं असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
कोरोनाच्या संकटकाळात काही जणांनी पुन:श्च राजकारण सुरु केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही, की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून नक्की बोलेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या आरोपाचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्ही जिथे गेला नाहीत अशा दुर्गम भागात मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचलो आहे.