मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरुन संसदेतही गदारोळ पाहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासह चौकशीची मागणी केली आहे. (BJP leader Chandrakant Patil criticized on state government and Anil Deshmukh)
अनिल देशमुख यांनी वसुली करण्यासाठी सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू केले होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांना सुद्धा दिली होती, त्यासंदर्भात त्यांनी काय केले? असा सवाल करत मागील एक वर्षांपासून हा तमाशा सुरू आहे. तसेच, सचिन वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट उघडकीस येऊन त्याचे सर्व पुरावे गुप्तचर विभागाने सादर करुनही मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन आज दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
("फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय", देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार)
अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा - अतुल भातखळकर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच, त्यांनी याविरोधात मुंबईतील समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.