"आघाडी सरकार उत्तम चाललंय; मग आमच्या लोकांना का आकर्षित करताय?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:15 AM2020-12-18T03:15:06+5:302020-12-18T06:41:15+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांचा अजित पवार यांना सवाल
शिर्डी : तुमचे आघाडी सरकार उत्तम चालले आहे. मग का आमच्या लोकांना आकर्षित करता? तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील यांनी गुरुवारी (दि. १७) सायंकाळी साईदरबारी हजेरी लावली.
भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, अजितदादा खूप चांगले नेते आहेत, चांगले काम करतात. पण, अजित पवारांमध्ये ताकद असती तर ऐंशी तासांचे सरकार त्यांना टिकविता आले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर पाटील म्हणाले, एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का? यांना निवडणूक आयोग, कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का, असा सवालही पाटील यांनी केला. आम्हीसुद्धा ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना सोबत नसल्याने आमचे नुकसान होते. मात्र, शिवसेना सत्तेत असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. आम्हाला काय फरक पडत नाही. मात्र, शिवसेना संपत चाललीय, अशी टीकाही त्यांनी केली.