जळगाव : "भाजप हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकनाथ खडसे असो की अन्य कोणी असो ते पक्ष सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही," असे स्पष्ट मत माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावात व्यक्त केले. "इतके दिवस झाले तरी राष्ट्रवादीने खडसे यांना मंत्रिपद दिले नाही. अजूनही त्यांना लटकवून ठेवले आहे," अशी टीकादेखील बावनकुळे यांनी केले.
भाजपच्या २५ लाख युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी ते जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
ओबीसी आणि बहुजन समाजाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर होणाऱ्या आरोपांबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, "भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये ६० टक्के मंत्री हे ओबीसी होते. आज महाविकास आघाडी सरकार आणि फडणवीस सरकारची तुलना करा. फरक सर्वांच्या लक्षात येईल. एकनाथ खडसे यांनाही पक्षाने खूप काही दिले. मी स्वतः तसेच पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे."
त्यांच्याबाबतीत एखादा विषय झाला असेल, काही घटना घडली असेल तर लगेचच पक्ष चुकीचा ठरत नाही. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेल्याने पक्षाचे काही एक नुकसान झालेले नाही. खडसेच काय तर कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही. कारण भाजप हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे, नेत्यांवर नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी खडसेंच्या आरोपांचाही समाचार घेतला.