मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेऊन २५ मिनिटे चर्चा केली. फडणवीस हे पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले; पण यानिमित्ताने दोघांमध्ये राजकीय गुफ्तगू झाल्याची जोरदार चर्चा आहे.फडणवीस यांनी या भेटीबद्दल ट्विट करून, ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले. या चर्चेच्या वेळी दोघेच उपस्थित होते. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, पदोन्नतीतील आरक्षण आदी विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. विविध संवेदनशील सामाजिक मुद्द्यांवर राज्य शासन अडचणीत आलेले दिसते. त्यावर मार्ग काढण्याबाबत फडणवीस यांनी काही सूचना केल्याचे कळते. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही; पण दोन बडे नेते एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा होणे साहजिक आहे, असे मत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.आपण सध्या राज्यभर दौरे करत असल्याची माहिती फडणवीस यांनी पवार यांना दिली. आपण स्वत: विरोधी पक्षनेता असताना राज्य कसे पिंजून काढत होतो, याबाबत पवार यांनी या वेळी सांगितले. केळी पिकासंदर्भात पीक विम्याच्या अटी केळी उत्पादकांवर अन्याय करणाऱ्या आहेत. माजी खासदार हरीभाऊ जावळे समितीने यासंदर्भात केलेल्या शिफारशी राज्य शासनाने स्वीकाराव्यात, अशी सूचना फडणवीस यांनी या वेळी केली.मध्यंतरीच्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ४० मिनिटे चर्चा केली होती. आज फडणवीस त्यांच्या भेटीला गेले. पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलाविली आहे.
शरद पवार-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा?; भाजपचा ज्येष्ठ नेता म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 10:03 AM