लाव रे तो व्हिडीओ! उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर बाण
By कुणाल गवाणकर | Published: October 20, 2020 10:29 AM2020-10-20T10:29:47+5:302020-10-20T10:33:12+5:30
Devendra Fadnavis Uddhav Thackeray: शेतकऱ्यांना तातडीनं मदत करून दिलासा द्या; फडणवीसांची मागणी
उस्मानाबाद: भाजप-शिवसेनेचं सरकार असताना अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजारांची मदत तातडीनं देण्याची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंचा तोच व्हिडीओ दाखवत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. टोलवाटोलवी करू नका. केंद्र मदत करेलच. पण त्याआधी तुम्ही काय करणार ते सांगा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. 'सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नाही. सरकारनं निकषाच्या फुटपट्ट्या बाजूला ठेवून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीनं जाहीर करावी. शेतकऱ्यांचं हेक्टरमागील नुकसान २५ ते ५० हजार रुपये इतकं आहे,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. फडणवीस यांनी उद्धव यांचा तोच व्हिडीओ दाखवत मुख्यमंत्र्यांकडे आता शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी आहे. त्यांनी तातडीनं शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही एक व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला. 'राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं जाहीर केलेली १० हजार कोटींची रक्कम अतिशय कमी आहे. फळभाज्या, फळबागा आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दीड ते दोन लाख कोटी रुपयांची भरपाई गरजेची आहे. पाहणी-आढावा घेतल्यानंतर मिळणारी मदत येईल तेव्हा येईल. पण आता सरकारनं तातडीनं मदत करावी,' असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. अजित पवारांचा हाच व्हिडीओ दाखवत फडणवीसांनी त्यांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली.
अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात आहे. त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारनं या प्रश्नात राजकारण करू नये. सत्तेत असलेल्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तरीही काल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे राजकीय बोलत होते. सत्तेत असलेल्या व्यक्तींनी संयमीपणे वागायचं असतं. संवेदनशीलपणे प्रश्न हाताळायचे असतात. इच्छाशक्ती असली की मार्ग काढता येतो, असं फडणवीस म्हणाले. 'वेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, असं इंग्रजीत म्हणतात. पण या सरकारच्या बाबतीत वेअर देअर इज नो विल, देअर इज ओन्ली सर्व्हे, असं म्हणायला हवं', असा टोला फडणवीस यांनी लगावला.