मुंबई: राज्यात पुन्हा वाढीव वीज बिलांचा मुद्दा तापला आहे. वाढीव वीज बिल आलेल्यांना सरकारकडून दिलासा देण्यात येईल, असं ठाकरे सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप तरी सरकारनं सर्वसामान्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केल्याची टीका त्यांनी केली आहे.'वाढीव वीज बिलांच्या संदर्भात राज्य सरकार जनतेला दिलासा देऊ शकत होतं. कारण ऊर्जा विभागाची स्थिती चांगली आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी याबद्दलची सविस्तर माहिती नुकतीच दिली. मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा अभ्यास कमी पडत आहे,' असा टोला फडणवीस यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेचा विश्वासघात सुरू असल्याचं म्हणत त्यांनी शरसंधान साधलं.महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजी; 'अर्थ'पूर्ण मुद्द्यांवरून तक्रारीकाही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक झाली. यानंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू: फडणवीसराज्यातील ऊर्जा विभागासाठी दीड ते दोन हजार कोटींचा फटका फार मोठा नाही. याशिवाय केंद्र सरकार यासाठी कर्ज देण्यास तयार होतं. मात्र राज्य सरकारनं कर्ज घेतलं नाही. त्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसत आहे. एसटी महामंडळाला निधी मिळाला ही चांगली गोष्ट आहे. पण वीज मंडळालादेखील पॅकेज मिळायला हवं होतं. कोरोना काळात इतर सर्व राज्यांनी विजबिलात सूट दिली आहे. पण महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका फडणवीसांनी केली.
महाविकास आघाडीकडून जनतेचा विश्वासघात; वाढीव वीजबिलांवरून फडणवीसांचा घणाघात
By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 7:04 PM