मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून येत्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या पक्षप्रवेश निश्चित असल्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी स्वत: पक्षांतराच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम दिला आहे.
भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेबाबत 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्ट शब्दात एकनाथ खडसे यांनी सांगितले. याचबरोबर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याविषयी मला काही माहिती नाही. तसेच, त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्यापही त्यांच्या पक्षांतर सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. तसेच, काल एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. या भेट कोणत्या कारणसाठी झाली. याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विशेष म्हणजे, विश्रामगृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले. त्यामुळे पुन्हा एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत तर्क-वितर्क सुरु झाले होते.