नवी मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला वेग आला आहे. आतापर्यंत भाजपाच्या १४ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपा नेते गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी हे राजकारण चांगलंच रंगल्याचं दिसून येत आहे.
याबाबत गणेश नाईक म्हणाले की, आतापर्यंत १४ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आम्हाला काही फरक पडत नाही, आमचे जितके नगरसेवक फोडाल त्यापेक्षा दुपटीने तुमचे फोडू, एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण करतोच असं सांगत नाईकांनी शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.(Navi Mumbai Municipal Corporation Election Update News)
शिवसेना नेत्यांचा एकला चलो रे नारा
नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यातच जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, यात महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा असल्याचं पाहायला मिळत आहे.
नवी मुंबईत महापालिकेत पक्षीय बलाबल (एकूण १११)
भाजपा – ५६
शिवसेना – ३८
राष्ट्रवादी – २
काँग्रेस – १०
इतर – ५
नवी मुंबईत महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे. नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता, त्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता कोसळली, अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक गणेश नाईकांची साथ सोडून पुन्हा स्वगृही परतत असल्याचं दिसून येत आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यासोबत मनसेनेही यंदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षापासून मनसेने नवी मुंबईत पक्षीय बांधणी केली आहे, यंदा पहिल्यांदाच ही महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरेंनी घेतल्या होत्या, मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला ५० हजारांपेक्षा जास्त मतदान शहरातील २ मतदारसंघात झालं होतं, त्याचसोबत इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.