भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. "शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ज्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही," असं म्हणत पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
"ही लोकशाही आहे. या राज्यात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. या राज्यात सर्व ओबीसी समाजापर्यंत जाणं हे माझं काम आहे. मला ओबीसींचा नेता म्हणावं असं माझं म्हणणं नाही," असं पडळकर यांनी स्पष्ट केलं. "महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं त्यांनी नमूद केलं.
मी लहान असल्यापासून पवार भावी पंतप्रधानच"मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढं कोणत्यातरी लावणात ससा सापडेल अशी अपेक्षा," असं म्हणत पडळकर यांनी टोला लगावला.
काही घराणी अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा असून मला सुसंस्कृतपणा माहित आहे. तुमच्या विरोधी बोलल्यानंतर सुसंस्कृतपणा दिसून येतो, मला तो शिकवू नका असं म्हणत पडळकर यांनी बाळासाहेब थोरत यांच्या कन्येला प्रत्युत्तर दिलं.