"देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षं आधीच; काही लोक भ्रमिष्टासारखे बरळताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:41 PM2021-06-28T19:41:02+5:302021-06-28T19:48:09+5:30
पडळकरांचा बाळासाहेब थोरातांना टोला. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली होती.
राज्यात आताच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य केलं होतं. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं, अशी विचारणा थोरात यांनी केली होती. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वक्तव्यावरून थोरातांना टोला लगावला आहे.
"महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही," असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत... मुळात मा. देवेंद्रजी फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही. @Dev_Fadnavis@BJP4Maharashtra#MahaVikasAghadipic.twitter.com/00vKB8Q7G4
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 28, 2021
फडणवीसांची घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे तुम्ही फार गांभीर्याने घेतले आहे. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. मात्र, तसे झाले नाही. सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. सामान्यांना फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर काय झाले आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका थोरात यांनी केली.
काय म्हणाले होते फडणवीस ?
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं आहे, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.