रत्नागिरी: दोनच दिवसांपूर्वी रंगलेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, ३९ वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, असं सूचक विधान राणेंनी केलं. ते जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीत बोलत होते.
शिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केलंय. त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. रमेश मोरेंची हत्या कशी झाली. आपल्याच आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. सगळी प्रकरणं टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू, अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. अनेक जुनी प्रकरणं आहेत. दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही, असं राणे म्हणाले.
महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. या २ वर्षांत कोकणाला काय दिलं, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. आपल्याला विधायक काम करायची आहेत. आम्ही घरात बसून राहत नाही. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून कामं करतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता शरसंधान साधलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम काम करत आहेत. देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. कोरोना काळात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्यासाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं. कोणीही उपाशी राहू नये म्हणून योजना जाहीर करण्यात आल्या. आता व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांची ओळख माजी आमदार, माजी नगराध्यक्ष अशी करून देण्यात आली. पुढील निवडणुकीत चित्र बदलेल. सगळे माजी आजी झालेले असतील. शिवसेना कोकणात औषधालादेखील सापडणार नाही, असं राणे म्हणाले.