Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुंबईतील दादर टीटी परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिवेसेनेनं नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत डिवचणारा बॅनर लावला होता. परंतु पोलिसांनी सध्या हे बॅनर काढून टाकलं आहे. शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे.
यामध्ये नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरकोंबडा असा उल्लेख करणारा फोटो आपल्या ट्विटर शेअर केला आहे. तसंच यामध्ये त्यांनी हा बॅनर कोण काढणार असाही सवाल केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे हेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले. नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असं सूचक विधान राणेंनी केलं.
"मी मुख्यमंत्र्यांवर बोललो की चिथावणीखोर विधान म्हटलं जातं. मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या विधानाचं काय," असा सवाल राणेंनी विचारला. "भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यावर थपडा लगावण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधान चिथावणीखोर नव्हतं का?," असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
ही गंभीर बाब"देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे," अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. "मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर दगडफेक केली. दोन दगड भिरकावणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे," अशा शब्दांत राणेंनी शिवसैनिकांचा समाचार घेतला.