पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बंगालच्या या रणधुमाळीत आता शिवसेनाही ‘जय बांगला’ म्हणत शड्डू ठोकणार आहे. शिवसेनापश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर अनेक स्तरातून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. "महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली पण संजय राऊत यांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही," असं म्हणत निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावला. निलेश राणे यांनी शिवसेनेनं निवडणुका लढवलेल्या ठिकाणची आकडेवारीदेखील मांडली आहे. "बिहार निवडणुक - नोटा १.६८%, शिवसेनेला ०.०५% मतं, गोवा निवडणुक - शिवसेनेनं ४० पैकी फक्त ३ उमेदवार उभे केले आणि त्या ३ उमेदवारांची एकूण मतं ७९२. महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली. पण संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही," असं म्हणत राणे यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला.
यापूर्वीच्या लढती यापूर्वी शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांत निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवले होते. अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावरून वाद झाल्याने तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचे चिन्ह घेऊन शिवसेनेने २२ उमेदवार दिले होते. मात्र, एकाही जागी शिवसेनेला डिपॉझिटही राखता आले नाही.