नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) भेटीला गेल्या आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक सुरू असून, बैठकीत मुंडेसह विनोद तावडे(Vinod Tawade), विजया रहाटकरदेखील उपस्थित आहेत. आता पंकजा आणि मोदींमध्ये नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचेच लक्ष्य लागून आहे.
पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) पार पडला. त्यात महाराष्ट्रातून चर्चेत असलेल्या भाजप नेत्या प्रितम मुंडे(Pritam Munde) यांना डावलून राज्यसभा खासदार भागवत कराड(Bhagwat Karad) यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
पंतप्रधान साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिवांशी संवाद साधणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची या सचिवांशी चर्चा होईल. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यावर यात चर्चा होऊ शकते.
'भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही'
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले होते. भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडेंसह हिना गावित आणि इतरांचीही नावे चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असते. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असेच होते. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.