मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मंत्रीपदासाठी अनेक नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रीपद मिळणाऱ्या नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांसाही समावेश आहे. नारायण राणे, भागवत कराड यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय, कालपर्यंत भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. पण, आज प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्ल्या एका ट्विटवरुन प्रीतम यांना मंत्रीपद मिळत नसल्याचे दिसत आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली तेव्हापासून महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. अगदी कालपर्यंत प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात होते. पण, आज सकाळपासून संपूर्ण परिस्थितीच बदलली आणि अनपेक्षित चेहरे, जसे भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांचे कॅबिनेट मंत्रीपद हुकल्याची चर्चा सुरु झाली. हा सर्व संभ्रम पंकजा मुंडे यांनी दूर केला. 'खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत', असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.