पुणे – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत भाजपाचा भगवा फडकवणार असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवणं सोडा, हातही लावता येणार नाही असा टोला लगावला होता, त्यावर भाजपा नेत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांची पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेली बॉडी लँग्वेज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. भगवा काही पेटंट दिला का? आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का? जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा. छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा फक्त शिवसेनेचा नाही असा घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला.
तर परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे म्हणून पॅकेज आणि काँग्रेसकडे उर्जाखाते आहे म्हणून पॅकेज दिलं नाही. काँग्रेसची प्रतिमा उतरावी म्ह्णून प्रयत्न सुरू आहे. नितीन राऊत केवळ काँग्रेसचे आहेत म्हणून त्यांना तोंडावर आपटवण्याचे काम त्यांच्या महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांनी केलं का? काँग्रेसने अशी फरपट करून घेऊ नये असंही प्रविण दरेकर म्हणाले. तसेच १०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली नाहीच, कोरोना काळात अवाजवी बिल कमी केली नाही. उलट वीज बिल भरावचं लागेल, असं सर्क्युलर सरकारने काढले. हे सरकारला संकट काळात शोभा देणारं नाही. ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, उधळून लावू असा इशारा भाजपाने दिला आहे.
कंगनाला पाठिंबा नव्हे तर तिच्या बांधकामावर कारवाई करण्यास विरोध
मुंबईला पीओके म्हणणाऱ्या नटीचं समर्थन करणाऱ्यांच्या हातात मुंबई देणार का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला होता, त्यावर कंगनाच्या पाकव्याप्त काश्मीर या भूमिकेला समर्थन नाही. मात्र कंगनाची भूमिका पटली नाही म्हणून कंगनाचं बांधकाम तोडणार या प्रवृत्तीला विरोध होता असं प्रविण दरेकर म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.