औरंगाबाद – अब्दुल सत्तारांची आणि आमची दोस्ती खूप चांगली आहे. एकमेकांना मदत करतो. यापुढेही मदत करतील. अब्दुल सत्तार शिवसेनेत राहतील याची गॅरेंटी कुठे आहे? पहिले अपक्ष, मग काँग्रेस आणि आता शिवसेनेत.. केंद्राने राज्याला पैसे दिलेत आता राज्याने ते लोकांपर्यंत पोहोचवावेत. घाबरु नका, कोविड संपल्यावर आपलीच सत्ता येईल. कोविड संपलं की सत्तार मला भेटायला भोकरदनला येतील आणि बोलतील फडणवीसांना भेटायला जाऊया असा चिमटा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना काढला.
औरंगाबादेतील एका ग्रामपंचायत इमारतीच्या उद्धाटन कार्यक्रमात अब्दुल सत्तार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एकत्र आले होते. त्यावेळी दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तारांची सासरवाडी भोकरदन तर माझी सासरवाडी सिल्लोड आहे. आमची बहिण नगरपालिकेची अध्यक्ष होती तिला झेंडावंदनलाही बोलावलं नाही. लोकांच्या डोळ्यातील कुसळ आणि आपलं मुसळही दिसत नाही. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही. अब्दुल सत्तारसारखा नेता महाराष्ट्रात नाही, सगळ्यांना मदत करतो आणि निवडून आल्यावर नावं ठेवतो. यावेळेला मी तुम्हाला मदत केली नाही कारण मला याआधीच माहिती होतं शिवसेना काय करणार आहे असंही ते म्हणाले.
तसेच परिस्थिती कठीण आहे, एकमेकांसमोर तोंड बांधून उभं राहू असं कधी वाटलं नाही, पण काही लोकांच्यावर याचाही परिणाम होत नाही. ही जागतिक महामारी आहे. केवळ आपल्या देशात नाही तर जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली. लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला. वेळीच पंतप्रधानांनी हे संकट ओळखून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे त्यांचं जगातील अनेक देश कौतुक करतात. कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सक्षम आहे पण हतबल नाही. २० लाख कोटींचे केंद्र सरकारनं पॅकेज दिले. ८० कोटी लोकांना २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलोने तांदूळ दिले. कोविड काळात मोफत ५ किलो तांदूळ देण्याची योजना केंद्राने आणली. केंद्र सरकार सक्षमपणे पाठिशी उभे राहत असेल. पण राज्य सरकार काय करतंय? धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावेत असंही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
राजकारणात जनता हीच गुरू
माझ्या घरात, नात्यात कोणीही राजकारणात नव्हते. मला मतदारांनीच घडवले. गावाचा सरपंच केले तेव्हा गावाने घडवले. तालुक्याचा सभापती झालो, तेव्हा तालुक्यातील जनतेने मदत केली. पुढे जाफराबाद-भोकरदन तालुक्याचा आमदार झालो तेव्हाही त्या लोकांनी प्रेम केले. त्यानंतर पाच टर्म झाले जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. एकूण ३५ वर्षे आमदार-खासदार आहे. यात माझे फार काम आहे हे म्हणण्यापेक्षा लोकांनीच माझे नेतृत्व विकसित केले आहे. गत ३५ वर्षांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे लोकांचे अमाप प्रेम मिळाले. लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि सांगतील ती कामे केल्यामुळे प्रेम करतात असं रावसाहेब दानवे म्हणाले.