लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा देशभर उडू लागलाय. स्टार प्रचारकांच्या सभा गाजत आहेतच, पण अनेक वाचाळवीरांच्या वादग्रस्त विधानांवरूनही 'कल्ला' होतोय. आपलं भाषणकौशल्य दाखवण्यासाठी अनेक नेते नवनवे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच एक 'ब्रेथलेस' प्रयोग उत्तर प्रदेशातील भाजपाच्या सभेत पाहायला मिळाला. 'कमळा'लाच मत देण्याचं आवाहन करताना एका उत्साही नेत्यानं १७ सेकंदांत २७ वेळा कमळ, कमळ, कमळ म्हटलं. त्याला धाप लागली, पण तो थांबला नाही. या भाषणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालीय. त्यातील नेत्याचा आविर्भाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
मेरठमधीलभाजपाचे पदाधिकारी विनिती अग्रवाल शारदा यांनी राजेंद्र अग्रवाल यांच्या प्रचारसभेत दणदणीत भाषण केलं. मोदी सरकारचं गुणगान गात त्यांनी भाजपासाठी मतांचा जोगवा मागितला. त्यावेळी, जाता-जाता त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. खालील व्हिडीओत तो तुम्ही प्रत्यक्षच बघा...
सुरुवातीला १७ सेकंदांत २७ वेळा कमळ म्हणणाऱ्या विनित अग्रवाल शारदा यांनी शेवटच्या १८ सेकंदांतही ६ वेळा कमळ शब्द उच्चारला. कमळासमोरचं बटण इतक्यांदा दाबा की मोदी रामाच्या रूपात प्रकट झाले पाहिजेत, असं अजब आवाहनही त्यांनी केलं. ते ऐकून सगळेच चक्रावले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील भाजपा नेते जयकरण गुप्ता यांनी प्रियंका गांधींवर त्यांच्या पेहेरावावरून आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 'स्कर्टवाली बाई साडी नेसून मंदिरात डोकं टेकू लागली, जे गंगाजलाला निषिद्ध मानायचे तेच आज गंगेच्या पाण्याचं आचमन करू लागले, हे अच्छे दिन नाहीत का?', अशी वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली.