काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये का प्रवेश केला याचं कारण स्पष्ट केलं आहे. "आपण भाजपमध्ये येण्यासाठी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कोणत्याही प्रकारची डील केली नाही," असं जितिन प्रसाद यांनी स्पष्ट केलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. "आमच्या तीन पिढ्यांनी काँग्रेसची सेवा केली आहे. परंतु हळूहळू काँग्रेसमध्ये राहणं हे कठीण झालं होतं. मला वाटतं जनता ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. मी भाजपमध्ये राहून जनतेची सेवा करू शकतो," असं जितिन प्रसाद म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आम्ही जनतेमध्ये राहणारे आहोत आणि जनतेला काय हवं हे आम्हा जाणतो, असंही ते म्हणाले.जितिन प्रसाद यांनी राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्यावर भाष्य केलं नाही. "योगी आदित्यनाथ यांच्यासोबत राहून अधिक काम मी करू शकेन आणि पक्ष जे काही काम देईल ते मी करेन," असंही त्यांनी नमूद केलं. "काँग्रेसनं काहीच केलं नाही, असं वक्तव्य मी कधीही केलं नाही. मला मंत्रिमंडळातील मंत्री बनून सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु मला असं वाटतं की भाजप सोडला तर अन्य पक्ष कोणत्या विशेष व्यक्तीच्याच आसपास फिरताना दिसतात," असंही त्यांनी नमूद केलं.
कोण आहेत जितिन प्रसाद?
जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती.जितिन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहाँपूर आणि २००९ मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. २०११-१२ पर्यंत पेट्रोलियम आणि २०१२-१४ पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.