नागपूर : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या राकेश टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत. मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पटोले यांचे बुधवारी दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. विमानतळावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, अन्नदाता हा प्रमुख घटक अहे. पण मोदींनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. एवढी क्रूरता दाखविली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह संपूर्ण जनतेला आम्ही हे तीन काळे कायदे समजावून सांगू. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हे भाजपने देशाला शिकवू नये. पंतप्रधान मोदी लोकसभेत उभे राहून आंदोलनजीवी अशी उपरोधिक टीका करतात. ही नवी परंपरा त्यांनी सुरू केली. हे त्यांचे नवे देशप्रेम लोकांनी ओळखले आहे, अशी टीका त्यांनी केली.आपल्याला ऊर्जामंत्रिपद किंवा दुसरे कुठलेही मंत्रिपद मिळो न मिळो, पण माझ्या प्रदेशाध्यक्ष होण्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. जनतेतही ऊर्जेचा संचार आहे व त्याचीच जास्त चर्चा होत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमीच आक्रमक राहील, असेही ते म्हणाले. विधान परिषदेतील १२ नियुक्त्यांसाठी न्यायालयात जाणारमहाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या १२ जागांसाठी नावे निश्चित करून यापूर्वीच राज्यपालांकडे पाठविली आहेत. मात्र, राज्यपालांनी दबावापोटी ती रोखून धरली आहेत. याविरोधात काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले म्हणाले....काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांनी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमसह मतपत्रिकेवर घेण्याचा कायदा करावा, अशी विनंती राहुल गांधी यांना भेटून केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील वीजबील कमी करून द्यावे, ही काँग्रेसची अपेक्षा आहे. सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी होतेय तर भाजपची आगपाखड कशासाठी ?उपमुख्यमंत्रिबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होईल.
टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 3:30 AM