मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. यानंतर भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. काँग्रेसनं राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीनं दोन याद्या जाहीर केल्या आहेत. यानंतर आता सत्ताधारी भाजपाकडून आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा राज्यातील 48 पैकी 25 जागा लढवणार आहे. सध्या भाजपाचे राज्यात 22 खासदार आहेत. यापैकी 5 खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. पाच वर्षांमधील कामगिरी, जनसंपर्क यांच्या आधारे भाजपा नेतृत्त्वाकडून तिकीट वाटपाचा निर्णय घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल. यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला जाईल. भाजपा-शिवसेनेनं गेल्याच महिन्यात युती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा, शिवसेनेचे नेते उभे ठाकले होते. यातील जालन्याचा तिढा गेल्या आठवड्यात सुटला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात समेट घडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आलं. मात्र ईशान्य मुंबई मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. या मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांचाही सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत पर्याय शोधण्याचे आदेश दिल्लीहून राज्य भाजपाला देण्यात आले आहेत.
भाजपा कापणार 5 खासदारांचा पत्ता?; आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:39 PM