पुणे – भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या नाराज असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा होती, परंतु भाजपाने सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली, विधानसभा निवडणुकीवेळी मला विधान परिषदेचा शब्द दिला होता असा खुलासा मेधा कुलकर्णी यांनी केला. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना पक्षात डावललं जातंय का? असा प्रश्न कोथरूडमधील भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे.
याबाबत चर्चांवर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, विधानसभेवेळी मला विधान परिषदेचा शब्द दिला होता, विद्यमान कोथरूडचे आमदार आणि प्रदेशाध्यक्षांसाठी कोथरूड जागा सोडली असं म्हणण्यापेक्षा पक्षाचे आदेश होता तो मानला, पक्षासोबत माझी निष्ठा आहे, पक्ष माझा विचार करेल याचा विश्वास आहे. कोथरूड माझं माहेर आहे, कोथरूडमधून निवडणूक लढवणं यापेक्षा दुसरा आनंद नाही. माझ्यासाठी ते स्वर्ग आहे, कुठल्याही महिलेला माहेर किती प्रिय असतं हे सांगण्याची गरज आहे. कोथरूडमध्ये मी निश्चित पुढील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे असं त्या म्हणाल्या.
तसेच मेधा कुलकर्णी भाजपा सोडणार अशा बातम्यांवरही त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की, माझ्याबाबत अनेक बातम्या मुद्दाम पसरवल्या जातात. मला इतर पक्षाकडून तिकीट देण्याचे प्रयत्न होतात, मात्र वस्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर मांडली आहे. जे कोणी असा खोडसाळपणा त्यांनी तो थांबवला पाहिजे, मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, कोणाकडूनही निवडणूक लढवणार नाही, भाजपाने पदवीधर निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले त्यांचे काम प्रामाणिकपणे करणार आहे असा खुलासा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
त्याचसोबत माझ्या भागातील नागरिकांचे माझ्यावर प्रेम आहे, अनेकांचे फोन येतात, त्यामुळे मला स्पष्टीकरण देणं गरजेचे होतं, मागच्या वेळी जेव्हा विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाही मी कोणाच्या संपर्कात नव्हते. एखादी कार्यकर्ता असेल तर तिला पदापेक्षा काम हवं असतं, एखाद्या व्यक्तीला कामापासून दूर ठेवणं त्यातून अशी भावना निर्माण होते. काम करण्याची तळमळ असते, काम करण्यासाठी जबाबदारी दिली पाहिजे, मला चीनच्या बोर्डरवर पाठवलं तरी चालेल असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
दरम्यान, मी पक्षावर नाराज असण्याचं कारण नाही, केंद्रातलं सरकार अतिशय उत्तमपणे काम करतंय, गेल्या ६० वर्षात जे निर्णय होऊ शकले नाहीत ते केंद्र सरकारने केले आहेत. माझं आयुष्य पक्षासाठी ओवाळून टाकेन, काहींच्या बद्दल माझी नाराजी, म्हणणं असू शकतं, पक्षाच्या हितासाठी जे म्हणणं असेल ते पक्षांतर्गत मांडेन, पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही, मी कायमस्वरुपी भाजपात आहे. मी स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे, मी लहानपणापासून संघाच्या कुटुंबात वाढले, विचारसरणी संघाची आहे. पक्ष सोडून जायचं नाही, भाजपा माझ्या गुणांची दखल घेईल याची खात्री आहे. काही जुनेजाणते कार्यकर्तेही आता डावलले जात असल्याचं दिसून येते, त्यातून वेगळा विचार करण्याचा आग्रह करतात, पण मी त्यांना सांगते, आपण विचारधारेसाठी नेहमी सक्रीय राहिलं पाहिजे. मी पक्षात कार्यकर्ता म्हणून आहे, नेतृत्वाने याबदद्ल निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार करणे अपेक्षित असतं असं सांगत मेधा कुलकर्णी यांनी भाजपा सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.