मुंबई – गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपाचं ‘मिशन मुंबई’ सुरू झालं आहे. मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर घडवलं. शिवसेनेच्या(Shivsena) या खेळीनं सर्वाधिक १०५ आमदार असूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे याचा वचपा काढण्यासाठी भाजपानं(BJP) मुंबई ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे.
अलीकडेच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे(Narayan Rane) यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लावून भाजपानं मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणूक कोअर कमिटीत आमदार नितेश राणेंचा समावेश करण्यात आला आहे.
मुबंईत आज भाजपाच्या महानगरपालिका निवडणूक कोअर कमिटीची बैठक झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं कोअर कमिटी गठीत केली आहे. या कमिटीत भाजपाच्याअनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश असून त्यात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, प्रवक्ते संजय उपाध्याय आदी नेत्यांचा या कमेटीत समावेश आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी या कोअर कमिटीवर विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे.
आमदार नितेश राणेंच्या निमित्तानं भाजपाला शिवसेनेवर आक्रमकरित्या वार करणारा नेता मिळाला आहे. नितेश राणे यांची आक्रमक शैली आणि शिवसेनेला रोखठोक उत्तर देण्यानं भाजपाला फायदा होणार आहे. अलीकडेच राम मंदिर जमिनीच्या कथित व्यवहारावरून भाजपानं शिवसेना भवनासमोर मोर्चा काढला होता. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं राडा झाला होता. या भाजपा कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी जाहीर सत्कार करत शिवसेनेला डिवचलं होतं.
यावेळी नितेश राणे म्हणाले होते की, शिवसेना भवनासमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा की, तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात. भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून नितेश राणेंचा कोअर कमिटीत समावेश करणं महत्त्वाचं मानलं जात आहे.