बारामती : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजप (BJP) सत्तेचा पूर्ण गैरवापर करत आहे. बंगालमधील नागरिक हे स्वाभीमानी आहेत. बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर संपूर्ण बंगाल एकसंध होतो. कोणी काही म्हणाले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. (who will win in upcoming Assembly Elections in 5 states; Sharad pawar told Bjp will win only one state Assam.)
माळेगाव (ता. बारामती ) येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत मत व्यक्त केले.
सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये (Assam Assembly Election 2021) भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल. मात्र केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल (Kerala, West Bengal, Tamilnadu Assembly Election 2021) इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्ता देखील डाव्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा डाव्यांचे सरकार येईल. तर तामिळनाडूमधील लोकांचा कल स्टॅलिन व त्यांचा पक्ष डीएमके यांच्या बाजूने आहे. त्यामुळे तेथे डीएमकेची सत्ता येईल, असे सूतोवच पवार यांनी केले.
आसाममध्ये भाजपचे राज्य आहे. त्यामुळे आसामध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भाजपला यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवी दिशा देणारे ठरतील असेही पवार म्हणाले.