मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात बॉलिवूड आणि ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे उघडे पडत आहेत, या प्रकरणात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांची नावं समोर येत आहेत, एनसीबीचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र सोमवारी गोरेगाव परिसरात एनसीबीच्या पथकावर ड्रग्स तस्करांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणावरुन भाजपा आमदार आशिष शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत शेलारांनी ट्विट केलंय की, मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला, ड्रग्ज रँकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणतेय? कुणाला सत्य समोर येईल याची भिती वाटतेय? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन महाराष्ट्रात जंगलराज आणताय का? असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
काय आहे घटना?
गोरेगाव येथे तब्बल ६० जणांच्या टोळक्याने वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीचे पाच जणांचे पथक कॅरी मेंडीस नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कॅरी मेंडीस आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींविरोधात आयपीसी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनसीबीच्या याच पथकाने शनिवारी कॉमेडी किंग भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा मारला होता. यावेळी भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. भारती आणि हर्ष दोघंही आता तुरुंगात असून त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना रविवारी कोर्टाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयान कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली या दोघांनी दिली असल्याचं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.
एनसीबी अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात छापे टाकत होते. तसेच भारती आणि हर्ष या दोघांना समन्स बजावण्यात आले होते. अटकेत असलेल्या एका ड्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एनसीबीला एक संशयास्पद अमली पदार्थ (गांजा) सापडला आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपालपर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे.