भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन शिवसेनेला धारेवर धरलं आहे. भातखळकर यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची भाजपचे माजी राज्यसभा खासदार एम.जे.अकबर यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांच्या प्रकरणाशी तुलना केली आहे.
शिवसेना अकबर यांच्या प्रकरणावर वेगळी भूमिका घेते आणि मुंडे प्रकरणावर वेगळी भूमिका घेतेय. शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर यांचं ट्विटभातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. एम.जे.अकबर यांच्यावर आरोप झाले, तेव्हा बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेचे नेते धनंजय मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग करत आहेत. या बोटाची थुंकी त्या बोटावर फिरविण्यात शिवसेनेचा हात कोण धरेल?"
भातखळकर यांनी धनंजय मुंडे प्रकरणात आक्रमक भूमिका घेत याआधीच निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांनी एकाप्रकारे खोटी माहिती सादर करून नियमांची पायमल्ली केली असल्याने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.