मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना या वादात भाजपानेही उडी घेतली आहे. कंगनाला हरामखोर असा शब्द वापरल्याने शिवसेना नेते संजय राऊत अडचणीत आले. अनेकांनी राऊतांच्या या विधानाला आक्षेप घेत शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा अपमान केला असा आरोप केला. त्यानंतर या शब्दावरुन संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले.
नॉटी अन् बेईमान या शब्दाला मराठी भाषेत हरामखोर म्हटलं जातं. कंगनाही नॉटी गर्ल आहे. तिची वक्तव्ये नेहमी अशाच प्रकारे असतात असं सांगत संजय राऊतांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर...ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय आहेत असा टोला लगावला.
यापूर्वीही अतुल भातखळकर यांनी अनेकदा शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना कंगना राणौतनं उघड आव्हान दिलंय. जिने बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत अशा शब्दात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा समाचार घेतला होता.
तर माझी ताकद काय आहे, हे १०५ निवडून आल्यानंतर विरोधात बसलेत त्यांना विचारा असं राऊत म्हणाले होते. त्यावर विश्वासघाताने १०५ संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले हे खरे. सत्ता हाती आहे, परंतु धमक नसल्याने मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडत नाही त्याचे काय? घरात कडी लावून बसायला सत्ता हस्तगत केली होती काय? असा सवालही आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता.
नॉटी गर्लवरुन अमृता फडणवीसांनीही डिवचलं
आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत असं सांगत अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते