मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी, रविवारी या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांची चाचणी करण्यात आली. पण अनेकांना रिपोर्टसाठी ताटकळतच राहावं लागलं.
सोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार असल्याने आधी रिपोर्ट नंतरच विधिमंडळ प्रवेश दिला जात होता. अनेकांचे रिपोर्ट विधिमंडळ गेटवरच संबंधितांना सोपवण्यात आले. पण स्वॅब घेऊनही अनेकांचे रिपोर्ट न मिळाल्याने विधिमंडळ गेटवर आमदारांमध्ये गोंधळ उडाला. २४ तासानंतरही आमदारांच्या चाचणीचा अहवाल आला नाही. त्यामुळे आतमध्ये जाता येत नव्हतं. सरकारने एजेंट ठेवलेत का? अशा शब्दात विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपा आमदारांसोबत काही शिवसेना आमदारही गेटवरच अडकले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे पोहचले. हा संपूर्ण प्रकार आमदारांनी अजित पवारांच्या कानावर घातला. त्यानंतर अजितदादांनी आपल्या शैलीत अधिकारी आणि कर्मचारी यांचा चांगलाच समाचार घेतला. रिपोर्ट मिळाला नाही तर कामकाज चालणार कसे? आमदारांचे रिपोर्ट नाहीत मग आतमध्ये प्रवेश नाही. ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा असा आदेशच अजित पवारांनी दिला. अजित पवारांनी खडसावल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आले. त्यानंतर या आमदारांना विधिमंडळात प्रवेश देण्यात आला.
विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षविना पार पडणार अधिवेशन
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते क्वॉरंटाइन झाले आहेत, ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे आजपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल. मात्र, पूर्ण अधिवेशन काळात अध्यक्ष आलेच नाहीत, असे याआधी कधीही घडलेले नाही. पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आहे. तसेच ते फोनवर येऊ शकणार नाहीत, असे त्यांच्या निवासस्थानी सांगण्यात आले. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरण्याची सूचना देण्यात आली आहे.
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कामकाज सांभाळणार
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.
बैठक व्यवस्थेत बदल
सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले आहे.