पुणे: वाफगाव किल्ल्यातील शाळा दुसरीकडे हलवून किल्ल्याच्या संवर्धनासाठी पन्नास कोटी देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. समस्त धनगरांची, बहुजन समाजाची आस्था या किल्ल्यात आहे. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण नको, असं पडळकर म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरला, आता किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी द्या, असं पडळकर म्हणाले.वाफगाव किल्ल्याला संवर्धित वास्तूचा दर्जा देण्याची मागणी पडळकर यांनी केली. वाफगाव किल्ल्याचं संवर्धन, जतन व्हायला हवं. त्यामुळेच या किल्ल्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा. ही संस्था सरकारच्या ताब्यात द्यावी किंवा होळकरांच्या ताब्यात द्यावी. जे योग्य असेल ते करावं. या वास्तूला संवर्धित वास्तूचा दर्जा देऊन ५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं त्वरित द्यायला हवा, अशी मागणी पडळकर यांनी केली.
होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात, मग आता...; पडळकरांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 10:22 PM