जयपूर - बनावट सर्टिफिकेट दाखवून पत्नीला निवडणुकीत उभे करणे भाजपाच्या एका आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. बनावट सर्टिफिकेटच्या आधारे पत्नीला निवडणुकीत उभे केल्या प्रकरणी उदयपूरमधील सलुम्बरचे भाजपा (BJP) आमदार अमृतलाल मीणा यांची कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अमृतलाल मीणा यांनी २०१५ मध्ये बनावट सर्टिफिकेट्या माध्यमातून पत्नी शांती मीणा यांना निवडणुकीत उतरवले होते. (BJP MLA jailed for fake certificate of wife)
या प्रकरणी अमृतलाल मीणा यांची पत्नी शांती मीणा यांनाही अटक झाली होती. त्यानंतर झालेल्या तपासात या प्रकरणामध्ये आमदार मीणा यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, सहाडा सिव्हिल कोर्टाने सुनावणीवेळी आमदार अमृतलाल मीणा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, कोर्टाचे आदेश येताच पोलिसांनी आमदार अमृतलाल मीणा यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सिव्हिल कोर्टाच्या या निर्णयाला एडीजे कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचे अमृतलाल मीणा यांनी सांगितले. सेमारी येथील सरपंच शांतादेवी यांच्याविरोधात एजीएम कोर्टामध्ये तक्रार दाखल झाली होती. यामध्ये पाचवीचे बनावट गुणपत्र बनवून पंचायत समितीची निवडणूक लढवल्याचा आरोप शांतादेवी यांच्यावर करण्यात आला होता.