मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल (बुधवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण ऐकून शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. (BJP MLA Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray’s speech in the Assembly)
नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांचे भाषण ऐकल्यानंतर मला असे वाटले की, आता शिवसेनेची अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे," असे ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना उपहासाने नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरुन आता जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'नटसम्राट'ला कालच नितेश राणे यांनी 'कॉमेडी सम्राट' असे प्रत्युत्तर दिले.
'कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री!'आज एक कॉमेडी सम्राट विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! "कुणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री?", अशा शब्दांत नितेश राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील भाषणाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोललेच नाहीत, असेही नितेश राणे म्हणाले.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत? अशी स्थिती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तसेच, मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला.