मुंबई – शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब(Shivsena Anil Parab) यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर विरोधकांनी अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकणी भाषेत अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिवहन खात्यात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली.
सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनिल परब गोत्यात आले. आमदार नितेश राणेंनी(BJP Nitesh Rane) ट्विट करत म्हटलंय की, ओ परबांनू, मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावुक नको. आजच उरलीसुरली लाज वाचवा आयकतास ना” असा टोला अनिल परब यांना लगावला आहे.
काय आहे प्रकरण?
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील दोन वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले. यानुसार गेल्या तीन दिवसांपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. सोमवारी (दि.३१) तक्रारदार निलंबित मोटार निरिक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. संपुर्ण दिवसभर आयुक्तालयाच्या वास्तुमधील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. यामुळे आयुक्तालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पाटील यांच्या चौकशीमधून काही बाबी समोर आल्या असून अंशत: चौकशी सोमवारी पुर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
'मातोश्री'तील खास माणसाला सहानुभूती का?
'कॅबिनेट मंत्र्याविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी वेगळा नियम का का?. जर, संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग'मातोश्री'तील खास माणसाला सहानुभूती का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला होता. तसेच, याप्रकरणी सीबीआय चौकशीच न्याय मिळवून देईल, त्यापेक्षा काही कमी नाही', असे म्हणत सीबीआय चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.