मुंबई: राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीनं खून केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला आहे. 'या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे.. कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा.. शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे.. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल.. तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!!', अशी घणाघाती टीका राणेंनी केली आहे.
Maratha Reservation: "राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीनं खून"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 12:30 PM