मुंबई – महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राज्यातील काही आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यानंतर विरोधी पक्ष भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. शरद पवारांसारख्या नेत्याचं नाव घेतात तेव्हा आपण काय बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे असा टोला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, गृहमंत्र्यांच्या बुद्धीची किव येते, गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करताना १०० वेळा विचार करावा, ज्या अधिकाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत त्या महिला आहेत. कोणत्याही महिला अधिकाऱ्याचा अपमान करणे योग्य नाही, शरद पवारांकडून गृहमंत्र्यांनी क्लासेस घ्यावेत. संजय राऊतांनीच घरचा आहेर दिला ते बरं झालं असंही त्यांनी सांगितले.
भाजपा राजकारण करणार नाही
युतीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण आणलं, पण हे सरकार मराठा आरक्षण टिकवण्यात असमर्थ ठरलं, या गोष्टीचा सरकारनं विचार केला पाहिजे, भाजपा राजकारण करणार नाही परंतु मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहेत. मराठा आरक्षण होईपर्यंत भाजपा गप्प बसणार नाही असा इशाराही भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते गृहमंत्री अनिल देशमुख?
पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माझ्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.
मग नेत्यांचा काय उपयोग? - खा. संजय राऊत
गृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खा. संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही. काही अधिकाऱ्यांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील असं ते म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची संपूर्ण मुलाखत पाहा –